
राजापुरातील पोस्टातील रेल्वे आरक्षण सुविधा बंद
राजापूर: कोकणवासियांसाठी कोकण रेल्वेमुळे जग अधिकच जवळ झाले आहे. त्यामध्ये शहरापासून सुमारे पंधरा किमी अंतरावर असलेल्या तालुक्यातून धावणाऱ्या कोकण रेल्वेची आरक्षण सुविधा शहरातील पोस्ट कार्यालयामध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे राजापूरवासियांची सोय झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरातील पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र विद्युत व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे बंद होते. त्यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्या राजापूरवासियांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोकण रेल्वेमार्गावर विस्ताराने मोठ्या असलेल्या राजापूर तालुक्यासाठी सोल्ये येथे ‘राजापूर रोड’ हे एकमेव स्थानक असून, त्याच्या जोडीने सौंदळ येथे व्हॉल्ट स्टेशन आहे. शहरापासून सुमारे १८ ते २० किमीवर असलेल्या या स्टेशनवर जाऊन रेल्वे आरक्षण करणे प्रवाशांसाठी खर्चिक बाब ठरत होती. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य पोस्ट कार्यालयाप्रमाणे राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू केले जावे, अशी कित्येक वर्षांची मागणी होती. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राजापूर पोस्ट कार्यालयात आरक्षण सुविधा केंद्र सुरू झाले. या केंद्राचा अनेक रेल्वे प्रवाशांनी लाभ घेतला आहे; मात्र, गेल्या आठवडाभरापासून हे केंद्र तांत्रिक कारणास्तव बंद आहे. येथे विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देणे अशक्य झाले आहे. संबंधितांनी तांत्रिक बिघाड तत्काळ दूर करून बंद पडलेली आरक्षण सुविधा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी तालुकावासीयांकडून केली जात आहे.
आरक्षणचा फलक पोस्टात हवा
राजापूर शहरातील पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू झाले असले तरी त्याची सर्वसामान्य माहिती व्हावी या दृष्टीने पोस्ट कार्यालयाबाहेर कोणताही मार्गदगर्शक फलक लावलेला नाही. त्यामुळे आरक्षणासाठी येणाऱ्या प्रवाशांना नाहक इकडे तिकडे फिरावे लागत आहे. सर्व प्रवाशांसह ग्रामस्थांना माहिती मिळेल, असा रेल्वे आरक्षण सुविधा केंद्राचा फलक पोस्ट कार्यालयाबाहेर लावण्यात यावा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.