
मोकाट गुरांना बांधले रेडियम बेल्ट
सहा तरुणांचा उपक्रम ; अपघात टाळण्यासाठी प्रयत्न
रत्नागिरी : दररोज अनेक रस्ते अपघात होतात. त्यामधील बहुसंख्य अपघात वाहनचालकांना रात्री अंधारात रस्त्यातील गुरे न दिसल्यामुळे झालेले आहेत. या घटनांमध्ये वाहनचालकांसह गुरेही जायबंदी होतात. हे प्रकार टाळण्यासाठी उनाड गुरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट बांधण्याचा उपक्रम रत्नागिरीतील सहा तरुणांनी हाती घेतला आहे. आतापर्यंत १०० मोकाट गुरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट बांधण्यात त्यांना यश आले आहे. गोसेवा महासेवा मानून ते हे काम करत आहेत.
शहरांसह ग्रामीण भागातही आजकाल मोकाट गुरांचा प्रश्न सतावत आहे. गुरांचे संगोपन करण्याऐवजी मालक त्यांना मोकाट सोडून देतात. त्यामुळे या मोकाट गुरांचे वास्तव्य शहर परिसरात वाढलेले आहे. गुरांचे कळप रस्त्यावर ठाण मांडून राहतात. त्यामुळे अनेकदा वाहन अपघातांच्या घटना घडतात. रस्त्यावरील मोकाट जनावरांचा प्रश्न रत्नागिरीतील अनेक भागांमध्ये भेडसावतो. रस्त्यांवर प्राणी सोडले जाऊ नयेत यासाठी अनेकदा प्रशासन स्तरावरूनही आव्हान करण्यात आले आहे; मात्र अनेक गुरे मालकांचा या आवाहनाला प्रतिसाद मिळत नाही. आज काही सेवाभावी संस्था अशा गुरांच्या संगोपनासाठी पुढे सरसावलेल्या आहेत; पण त्यांच्यासमोरही काही मर्यादा आहेत. रस्त्यावर फिरणारी मोकाट गुरे वाहनचालकांना रात्रीच्या अंधारात न दिसल्यामुळे त्यांना धडक बसते. त्यातून गुरे हकनाक बळी पडतात. अनेकदा माणसांच्याही जीवाला धोका होतो. हे टाळण्यासाठी रत्नागिरी शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणांनी गोसेवा महासेवा मानून सेवाभावी कार्य हाती घेतलेले आहे. त्यात अनुप सिंह, सूर्यवीर सिंह, वने सिंह, हिम्मत सिंह, प्रकाश कुमार, प्रवीण कुमार या तरुणांचा समावेश आहे. हे सर्व तरुण दुकानातील काम संपल्यानंतर रात्री या कार्यासाठी बाहेर पडतात. शहर परिसरात मोकाट गुरांचा शोध घेतात. या गुरांना पकडणे हे मोठे आवाक्याबाहेरचे काम असते. त्यासाठी रात्रीच्यावेळी जेथे गुरांचा वावर असतो तेथे जाऊन त्या गुरांना खाद्य दिले जाते. त्यामुळे ती गुरे थांबताच त्यांचा अंदाज घेत गळ्यात रेडियम बेल्ट मोठ्या खबरदारीने लावला जात असल्याचे अनुप सिंह याने सांगितले. तो बेल्ट लावल्यास रात्रीही ते वाहनांच्या प्रकाशात चमकत असल्याने सहजपणे दिसू शकतात. शहर व परिसरात आतापर्यंत सुमारे १०० मोकाट गुरांच्या गळ्यात या तरुणांच्या टीमने स्वखर्चातून व अन्य मदतगारांच्या सहकार्यातून रेडियम बेल्ट बांधले असल्याचे सांगण्यात आले