
रुग्णालयात दाखल ‘त्या’ प्रौढाचा मृत्यू
संगमेश्वर: संगमेश्वर रेल्वेस्थानकावर आजारी अवस्थेत सापडलेल्या प्रौढाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दत्तात्रय रामदास दवणकर (४६) असे त्याचे नाव आहे.
दवणकर यांना दारूचे व्यसन होते. १५ नोव्हेंबरला ते हातपाय दुखत असल्याने व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संगमेश्वर रेल्वेस्थानकात बाकावर बसले होते. त्यांची ही अवस्था पाहून तेथील रेल्वेस्थानक मास्तर यांनी लगेचच दखल घेत त्यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.