
हर्णैत दोन तरुणांना १३ जणांकडून मारहाण
दापोली : तालुक्यातील कुंभवे राम मंदिराजवळील रस्त्यावर गणेश जनार्दन कुरळकर (२४, हर्णे), सचिन रामचंद्र कालेकर (३४, पाजपंढरी) यांना १३ जणांनी मिळून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना १३ रोजी दुपारी घडली.
याप्रकरणी अज्ञातांवर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कुरुळकर व सचिन कालेकर हे दोघेजण दुचाकीने दापोलीकडे येत होते. तेव्हा समोरून येणाऱ्या कारचा (एम.एच. १४ एफ. एस. ८६३०) चालक व आतील व्यक्तीनी गणेश कुरुळकर व त्याचा मित्र सचिन कालेकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि कुरुळकर व कालेकर यांना दुखापत केली. मागून येणाऱ्या अन्य दोन पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनातील आठ अनोळखी इसमांनी कुरुळकर याला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. कुरूळकर व कालेकर यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुमार यादव करीत आहेत.