
प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे चिपळुणात
चिपळूण: चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी १७ नोव्हेंबर रोजी खासदार सुप्रिया सुळे या चिपळूण दौऱ्यावर येत आहेत.
या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार यादव यांच्या प्रचारासाठी आघाडीच्या नेतेमंडळीनी कंबर कसली आहे. यापूर्वीच पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जाहिर सभा झाल्या आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनीही जिल्हा परिषद गटांमध्ये मेळावे घेतले आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संपूर्ण कोकणातील चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील ही एकमेव जागा असल्याने पक्षाने या जागेवर अधिक लक्ष दिले आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच प्रचाराची रणधुमाळी संपुष्टात येण्याच्या एक दिवस अगोदर १७ रोजी खासदार सुळे यांचा दौरा निश्चित झाला आहे. बहादूरशेख नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर ही सभा घेण्याच्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.