
निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 रोजी दापोलीत
दापोली
निवडणूक प्रचाराकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 15 नोव्हेंबर रोजी दापोलीत येत आहेत. यानिमित्त महायुतीची महासभा आयोजित करण्यात आल्याची माहिती महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार योगेश कदम यांनी दिली. दापोलीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व जाहीरनामा प्रकाशनानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम यांनी जाहीरनाम्यातील अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रूपये दिले जातात ते आता 2100 रुपये करण्यात आले आहेत. मात्र विरोधक यावरदेखील टीका करत आहेत. लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आला असून राज्याची तिजोरी रिकामी झाल्याची टीका विरोध करत आहेत. मात्र त्याच विरोधकांनी आपण लाडक्या बहिणींचे पैसे वाढवल्यावर तीन दिवसात लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचे घोषित केलेले आहे. आता विरोधक हे तीन हजार रुपये कोणत्या माध्यमातून आणणार आहेत ते आधी त्यांनी जाहीर करावे.
त्याचप्रमाणे महायुतीच्या माध्यमातून शेतकऱयांना कर्जमाफी व शेतकऱ्यानी सन्मान योजनेतून वर्षाला 15000 रुपये देण्याची हमी सरकारच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच प्रत्येकास अन्न आणि निवारा देण्याससह वृद्ध पेन्शन धारकांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीदेखील स्थिर ठेवण्यासाठी शासन वचनबद्ध असून महायुतीच्या माध्यमातून 25 लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्याचे वचनदेखील या वचननाम्यात असल्याचे त्यांनी सांगितले.