
रत्नागिरीत साकारलेय ‘रोहिडा’ किल्ला प्रतिकृती
30 फुट लांब, 25 फुट रुंद, 4 फुट उंचीचा किल्ला पाहण्यासाठी तोबा गर्दी
रत्नागिरी : शहरातील साळवीस्टॉप नजिकच्या छत्रपती नगर येथील श्री शिवशंभू मित्रमंडळाने भोरनजिकच्या ‘रोहिडा’ म्हणजेच ‘विचित्र गडा’ची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. रोहिडा गडाची हुबेहुब प्रतिकृती पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी गर्दी करायला सुरुवात केली असून किल्ला साकारणाऱ्या तरुण, तरुणींसह चिमुकल्यांचे रत्नागिरीकर कौतूक करत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सौ. कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रतिकृतीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी किल्ल्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमावेळी उपस्थितांनी छ. शिवाजी महाराजांची आरती देखील म्हटली. या कार्यक्रमावेळी सौरभ मलुष्टे, पत्रकार राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर देखील उपस्थित होते.
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत 3 ते 4 किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच किल्ले रोहीडा. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात 42 गावे होती. त्यापैकी 41 गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात येतात. रोहीडा किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दूधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदि सुविधा पोहचल्या आहेत. त्यामुळे येथील जीवन सुखी झालेले आहे. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे 6 मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.
या किल्ल्यावर जाऊन तेथील वस्तूस्थितीचा अभ्यास करुन हा किल्ला साकारण्यात आला आहे. गौरव सावंत बंधू आणि मित्रपरिवाराने दिपावलीनिमित्त छत्रपती नगर नाचणे रोड साळवी स्टॉप येथे श्री रोहिडा विचित्र गड किल्ल्याची भव्यदिव्य प्रतिकृती साकारली आहे. या किल्ल्यावर भैरव मंदिर, पुष्प कर्णी तलाव, दीपमाळ, भुयारी तलाव, हौद, तटबंदी, महादरवाजा, ध्वज बुरुज, टाके, प्रवेशद्वार, तोफा, शिवरायांची अश्वरूढ मूर्ती, हौद, तुळशीवृंदावन अशी सजावट केलेली आहे.
हा किल्ला साकारण्यासाठी शौर्य गिरकर, शौर्य मांजरेकर, अखिलेश बांबाडे, श्रीयोग चव्हाण, सुधीर मावडी, आवेश शेलार, अथर्व शिंदे, तनिष रेडीज, कुणाल धूंदूर, अभिजित गिरकर, अजय रेडीज, वेदांत सावंत, वैभव पांचाळ, अथर्व खेडेकर, अथर्व बारे, विनय कदम, आर्यन चव्हाण, आकांक्षा चव्हाण, वेदिका चव्हाण, शिवांगी चव्हाण, नेहा सावंत, ऋषी दुधाणे, सिद्धू पुजारी, समृद्धी सावंत मनीषा मावडी, अंशिका शिंदे, प्रसाद सावंत, निखिल सावंत, गौरव सावंत रुचिक मुडे, राजस वने यानी हा श्री रोहिडा, विचीत्र गड साकारण्यासाठी 15 दिवस अहोरात्र मेहनत घेतली. या किल्ल्याची लांबी 30 फूट, रुंदी 25 फूट आणि उंची 4 फूट आहे. हा किल्ला पाहण्याची वेळ सायं 6 ते रात्रौ 11 वाजे पर्यंत ठेवण्यात आली आहे. हा किल्ला त्रिपुरा पोर्णिमेपर्यंत पाहण्यासाठी खुला ठेवण्यात येणार आहे. किल्ला पाहण्यासाठी इतिहास प्रेमी व किल्ला प्रेमींची गर्दी होत आहे.