
पेढे, बोरगाव येथे हातभट्टीवर पोलिसांचा छापा
दोघांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
चिपळूण: तालुक्यातील पेढे कुंभारवाडी व बोरगाव येथील अवैध हातभट्टी व गोवा बनावट दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर रविवारी गुन्हा दाखल केला आहे. वसंत येसू पडवेकर (वय ७०, रा. पेढे कुंभारवाडी), उपेश उदय चव्हाण (२९, बोरगाव उद्योगनगर, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
वसंत पडवेकर याने पेढे ते धामणदिवी जाणाऱ्या रस्त्यालगत स्मशानशेडच्या मागील बाजूस बी अवैधरित्या विनापरवाना गोवा बनावट दारू विक्री करताना आढळून आला. यामध्ये १ लाख १२ हजार रुपये किमतीच्या ७५० मिलीच्या बाटल्या व २८ हजार रुपये किमतीच्या १८० मिलीच्या बाटल्या असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानुसार वसंत पडवेकर याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३चे कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस बजावली आहे तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हाही दाखल केला आहे. याच पद्धतीने उपेश चव्हाण हाही बोरगाव बौद्धवाडी येथील धावली नदीकिनारी चिऱ्याचा डोह येथे झाडीझुडपात हातभट्टीची दारू गाळत असताना आढळून आला. त्याच्याकडून १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये २५७५ लिटर कुजके रसायन, उकळते रसायन व ३५ लिटर गावठी हातभट्टीची दारू याचा समावेश आहे. त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.