
उद्धव ठाकरे मंगळवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
रत्नागिरी: शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या मंगळवारपासून (दि. ५ नोव्हेंबर) प्रचार दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. पहिल्या दिवशी ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
दिवाळीनंतर पुढच्या आठवड्यापासून उद्धव ठाकरे कोकणातून या प्रचारदौऱ्याला सुरुवात करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ८ विधानसभा मतदारसंघांचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर आहे. त्याच दिवशी लढतींचे चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर प्रचाराला अवघे १५ दिवस मिळणार असल्याने लगेचच प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे.
त्यादृष्टीने शिवसेनेने जोरदार आखणी केली असून ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत. ५ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजता ते रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघांसाठी प्रचार करतील. दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता भिवंडी ग्रामीण विधानसभा, सायंकाळी ७ वाजता वांद्रे-कुर्ला संकुल मैदानात महाविकास आघाडीची सभा, ७ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता दर्यापूर विधानसभा, सायंकाळी ५ वाजता बडनेरा विधानसभा, ८ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता बुलढाणा विधानसभा, सायंकाळी ५ वाजता मेहकर विधानसभा, सायंकाळी ७ वाजता परतूर विधानसभा असा दौरा आहे.
महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा प्रारंभ येत्या बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुंबईत बीकेसी मैदानावर ६ नोव्हेंबरला महाविकास आघाडीची विराट सभा होणार आहे. या सभेला श्री. ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.