
कंपनीच्या छतावरुन पडून कसोप येथील तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी : शहरातील मिरजोळे एमआयडीसी येथील एका कंपनीच्या छतावरुन कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अभिजित आत्माराम शेलार (वय 35 रा. कसोप तेलीवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरालगतच्या कसोप तेलीवाडी येथील अभिजित शेलार हा रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला आला होता. कंपनीच्या छतावर काम करत असताना अचानक पत्रा तुटल्याने अभिजित हा खाली कोसळला. या घटनेत त्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने उपचारासाठी रत्नागिरी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. अभिजितच्या पश्चात वडील, भाऊ, वहिनी, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.