भाजप कार्यकर्त्यांनाही परिवर्तन हवे होते: पालकमंत्री सामंत
नातूंच्या नेतृत्वाखालीच गुहागरची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्टीकरण
गुहागर – जिल्ह्यातून यापूर्वी स्व. रामभाऊ बेंडल, तु.बा. कदम, शामराव पेजे यांच्यासारख्या नेत्यांनी नेतृत्व केले होते. यानंतर कधीच कुणबी समाजाला उमेदवारीची संधी मिळालेली नाही. यावेळी मात्र, हे धाडस शिवसेना शिंदे गटाने केले असून कुणबी समाजाला राजेश बेंडल यांच्यारुपाने गुहागरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच भाजप कार्यकर्त्यांनाही येथे परिवर्तन हवे असून याबाबत मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो असून सर्वच बेंडल यांच्या प्रचारात सहभागी होतील व डाँ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जाईल, असे स्पष्ट मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
महायुतीच्यावतीने शिंदे गटाकडून राजेश बेंडल यांनी आज गुहागर तहसिल येथे उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्व. रामभाऊ बेंडल, स्व. डाँ. तात्यासाहेब नातू व स्व. सदाशिव आरेकर हे लोकनेते गुहागरला लाभले होते. त्यांच्यावेळचे राजकारण खूप वेगळे होते. कुणीच कुणावर आरोप किंवा टीका केली नाही. मात्र, गेली २० वर्षे गुहागरवासियांच्या निशिबी दुदैव होते आणि तसे नेतृत्व मिळाले. मात्र, यावेळी बेंडल यांच्या रुपाने येथे परिवर्तन होणार आहे. गुहागरचे शिंदे गटाचे कार्यकर्तेही पक्षाच्या आदेशानुसार, आज एकत्र आले. भाजपचे काही कार्यकर्तेही आज उपस्थित आहेत. आणखी उद्यापासून सहभागी होतील आणि बेंडल यांना या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
उमेदवार राजेश बेंडल म्हणाले, मी बारा वाजता उठतो अशी माझ्यावर टीका करण्यात आली. बारा वाजता उठणारा सभापती, नगराध्यक्ष झाला असता का, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित करुन ज्यांनी माझ्यावर अशी टीका केली त्यांचे मी यावेळी नक्कीच बारा वाजवेन, असा एकप्रकारचा इशारा दिला. गुहागर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. कुणबी समाजाचा असलो तरी सर्व समाजाला घेऊन जाण्याची माझी वृत्ती आहे.आजपासून राजेश बेंडल हा तुमचा असून सर्व समाजाचा मी विकास करणार असल्याची ग्वाही बेंडल यांनी दिली.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गुहागर शिवाजी चौक येथील शिवाजीमहाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रँली काढण्यात आली. यानंतर सभा घेऊन बेंडल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, गुहागर तालुकाध्यक्ष बाबू कनगुटकर, सर्व पदाधिकारी, भाजपचे काही कार्यकर्ते उपस्थित होते.