
राजापूर भाजपच्या उल्काताई विश्वासराव यांचा तडकाफडकी राजीनामा
राजापूर :महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस अनपेक्षित बदल होताना दिसत आहेत. या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवार उल्काताई विश्वासराव यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पाठवल्याने खळबळ उडाली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची पोष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटल आहे की.माझ्या सर्व भाजपा सहकाऱ्यांना माझा नमस्कार, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेली १० वर्षे भाजपाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करत असताना वाडी-वस्ती-मोहल्ला येथे जाऊन आपल्या सर्वांच्या साथीने पक्ष संघटन अधिक बळकट कसे करता येईल याचे काम केले. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली परंतु यापुढे काम करणे कठीण झाले आहे, त्यामुळे प्रदेशाध्यक्षांकडे माझा राजीनामा सुपूर्द केला आहे. आपण सर्वांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आणि जे स्नेह, प्रेम आपण दिले त्याबद्दल मी कायमचं ऋणी असेन असे म्हटले आहे. त्यांच्या राजीनाम्याने कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
उल्का विश्वासराव या गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूर -लांजा-साखरपा मतदार संघात त्या विधानसभा निवडणुक प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून त्यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळेल अशी त्यांची इच्छा होती.. परंतू उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा सध्या या मतदार संघात चालू आहे.