
महाराष्ट्रातल्या वाचनचळवळीत सर्वोत्कृष्ट काम करणारे 196 वर्षाचे सर्वात जूने पण अद्यायावत वाचनालय
माझ्या रत्नागिरी विधानसभेतील ही अभिमानाची गोष्ट – ना. उदय सामंत
रत्नागिरी : आज महाराष्ट्र शासनातील दोन जेष्ठ मंत्री मा. ना. रवींद्र चव्हाण व मा. ना. उदयजी सामंत यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाला एकत्र आवर्जून भेट दिली. त्याप्रसंगी वाचनालयात उपस्थित असणा-या वाचक बंधू भगिनींना समोर आपले शुभेच्छापर विचार मंत्रीद्वयीनी ठेवले.
स्वा. सावरकरांसारख्या महनीय व्यक्तींचा सहवास लाभलेले हे वाचनालय. या वाचनालयाने ठेवलेली उत्तम व्यवस्था आणि वाचनालयाची प्रदीर्घ वाटचाल, येथील 1 लाख 14 हजार पुस्तकांचे समृध्द ग्रंथभांडार हे सुसंस्कृत रत्नागिरीची ओळख आहे. असे सांगत वाचनालयाच्या पुनर्बांधकामासाठी आपले संपूर्ण सहकार्य राहील असे सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
मा. ना. उदय सामंत यांनी मुक्त कंठाने अॅड. दीपक पटवर्धन यांचे रचनात्मक कामाची प्रशंसा करत हे वाचनालय त्यांनी उत्तम पद्धतीने विकसित केले आहे. या वाचनालयाला 30 वर्ष मुदतीने जागा उपलब्ध व्हावी म्हणून मला माझ्या पदाचा वापर करुन योगदान देता आले हे माझे भाग्य आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आता प्राप्त झाला त्यामुळे आता वाचनालयांचे महत्व वाढणार आहे. अशा कालखंडात माझ्या रत्नागिरी मतदार संघातील हे ग्रंथसंपदा आणि दर्जेदार वाचक यांची मांदयाळी असल्याने या वाचनालयाला अधिक प्रभावी काम करता येईल, ग्रंथसंपदेने समृध्द असणारे हे वाचनालय उत्कृष्ट काम करत आहे, हे वाचनालय माझ्या मतदार संघात आहे ही बाब माझ्यासाठी व रत्नागिरीकरांसाठी अभिमानाची आहे. असे सांगत ह्या वाचनालयाच्या भविष्यातील सर्व उपक्रांसाठी शुभेच्छा देत अॅड. पटवर्धन यांचे पाठीशी ठामपणे उभे राहू असे ना. उदय सामंत म्हणाले.
या प्रसंगी मंत्रीद्वयींचा शाल श्रीफळ पुष्प करंडक देऊन वाचनालयाचे वतीने अॅड. दीपक पटवर्धन यांनी सत्कार केला. या प्रसंगी श्री. बबनराव पटवर्धन, संतोष पावरी, श्रीराम भावे, केदार करंबेळकर, शिरिष दामले यांचेसह मोठा वाचकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे कार्यवाह आनंद पाटणकर यांनी केले.