गुहागर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात
गुहागर: गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना नेते भास्कर जाधव यांची उमेदवारी निश्चित असताना त्यांच्या विरोधात मात्र भाजप की शिंदेंची शिवसेना लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जाधव यांच्याविरोधात कोणता उमेदवार लढणार या वरून भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असून आता गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचे नाव पुढे येत आहे. मात्र, बेंडलदेखील कमळ की धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढणार यासाठीही स्पर्धा सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गट शिवसेनेच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये दापोलीतून संजय कदम, राजापूरमधून राजन साळवी, गुहागरमधून भास्कर जाधव यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र, गुहागरमध्ये महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गेली अनेक वर्षे माजी आ. कै. डॉ. तात्यासाहेब नातू व त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र माजी आ. डॉ. विनय नातू यांनी या मतदारसंघावर वर्चस्च मिळविले. मात्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर भाजपला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात राखता आलेला नाही. या मतदारसंघात भास्कर जाधव यांनी विनय नातूंकडून मतदारसंघ खेचून आणला. दोनवेळा राष्ट्रवादीतून आणि एकवेळ शिवसेनेतून अशी हॅट्रीक देखील केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनंत गितेंना चाळीस हजारांचे मताधिक्य मिळवून दिले. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेना मजबूत मानण्यात येत आहे.
गुहागरचा महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित नाही
आ. भास्कर जाधव यांच्याविरोधात कोण लढणार या बाबत वेगवेगळ्या स्तरावर चाचपणी करण्यात आली. सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातलग व खा. श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांच्या नावाची चर्चा झाली. त्यांनी मतदारसंघात कामदेखील सुरू झाले. त्याआधी दोन वर्षे भाजपकडून डॉ. विनय नातू हे मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. विपुल कदम यांच्या नावाला शिंदे गटातील काही नेत्यांकडूनच विरोध झाल्यानंतर जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांचे नावदेखील पुढे आले. सुरूवातीच्या काळात चिपळूणचे माजी आ. सदानंद चव्हाण यांचेही नाव चर्चेत आले. मात्र, आचारसंहिता लागून उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आली तरी गुहागरचा महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. या संदर्भात वाटाघाटी सुरू असून आता बेंडल यांचे नाव पुढे येत आहे.