
गॅस नावावर करण्यासाठी महिलांची गर्दी
तीन मोफत सिलेंडर; साडेपाच हजार बहिणींचे अर्ज
चिपळूण: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थींना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. त्यामुळे गॅस कनेक्शन आपल्या नावे करण्यासाठी महिलांची गॅस वितरण केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे गॅस वितरण केंद्रावर प्रचंड ताण येत आहे. योजनेचे लाभार्थी नक्की कोण असतील, याबाबत संभ्रम असताना सर्वच महिला आपल्या नावावर गॅस कनेक्शन करण्यासाठी अर्ज करत आहेत. चिपळूण तालुक्यामध्ये साडेपाच हजाराहून अधिक महिलांनी त्यासाठी अर्ज केले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जाहीर केलेल्या सर्व योजना स्थगित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मिळणार की, नाही याबाबत शंका आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील. यामध्ये आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे. दोन्ही योजनांचे निकष पाहता यापैकी किती कुटुंबांना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो, हे अजून स्पष्ट झालेले नाही. तीन गॅस सिलेंडरचा लाभ आपल्याला मिळावा यासाठी काही महिला कुटुंबातील आपल्याच नातेवाईकांना अंधारात ठेवून गॅस कनेक्शन आपल्या नावावर करण्यासाठी अर्ज करत आहेत. गॅस कनेक्शन नावावर करताना केवायसी करणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक महिला केवायसी करण्यासाठी खेटे मारत आहेत.