
राजेश बेंडल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
गुहागर:- रत्नागिरी जिल्हातील राजकारण विधानसभा निवडणूकीमुळे कमालीचे बदलत आहे. गुहागरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेते, गुहागरचे माजी नगराध्यक्ष, माजी पंचायत समिती सदस्य राजेश बेंडल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बेंडल हे गुहागरमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असू शकतात. राजेश बेंडल हे कुणबी समाजाचे नेते आहेत. या पक्षप्रवेशासंबंधी पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत म्हणाले की राजेश बेंडल यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही विनंती केली आहे.
राजेश बेंडल यांना गुहागरमधून उमेदवारी मिळाल्यास जिल्हाच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. भाजपकडून सातत्याने या मतदारसंघाची मागणी केली जात होती. रत्नागिरीत भाजपला जागा मिळावी अन्यथा पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा देण्याची तयारी केली गेली होती. मात्र आता राजेश बेंडल यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे भाजपला ही जागा मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आता भाजपा कार्यकर्ते कोणती भूमिका घेणार हे महत्वाचे आहे. शिवसेना शिंदे गटाला हा मतदारसंघ मिळाल्याने रत्नागिरीमध्ये भाजपला एकही जागा मिळणार नसल्याचे दिसत आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघात गेली दोन टर्म वगळता अनेक वर्ष भाजपचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघामध्ये भाजपचे नेते स्वर्गीय तात्या नातू यांचा प्रभाव होता. त्यानंतरच्या काळात माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी देखील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळेल अशी अपेक्षा ठेवत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. मात्र आता या मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सांमत आमदार आहेत. गुहागरमधून शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव तर राजापूरमधून ठाकरे गटाचेच राजन साळवी आमदार आहेत. चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेखर निकम आमदार आहेत तर दापोली मतदारसंघातून शिंदे गटाचे योगेश कदम आमदार आहेत. त्यामुळे रत्नागिरीत सध्या शिवसेना ठाकरे गटाचे 2, शिंदे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा 1 अशी आमदारांची संख्या आहे.