
ठाकरे शिवसेनेच्या व्हायरल यादीत दोन उमेदवार
जाधव, साळवींचा समावेश; दापोली, रत्नागिरी प्रलंबित
चिपळूण: भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असली तरीही अन्य पक्षाकडून नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ४२ उमेदवारांची यादी सोशल मीडियावर फिरत असून त्यामध्ये गुहागर आणि राजापूर या दोन जागांवरील उमेदवारांची नावे आहेत. तर दापोली आणि रत्नागिरी मतदारसंघाबाबत संभ्रम कायम आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात यातील चार जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तर एक जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी तब्बल ४२ उमेदवार निश्चित केले आहेत. त्यांच्या नावाची पहिली यादी सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. राजापुरातून ठाकरे गटाचे राजन साळवी विद्यमान आमदार असून त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. गुहागरमध्ये भास्कर जाधव विद्यमान आमदार आहेत. याठिकाणाहून जाधव किंवा त्यांचा मुलगा अशी चर्चा होती. सोशल मीडियावरील त्या यादीत भास्कर जाधव यांचे नाव दिसत असल्यामुळे मुलाचे नाव मागे पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गुहागर, राजापूरसह दापोलीतून माजी आमदार संजय कदम निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ठाकरे गटात अजून त्यांच्यासमोर सक्षम स्पर्धक नाही, तरीही संजय कदम यांचे नाव त्या यादीत समाविष्ट नाही. रत्नागिरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष उदय बने इच्छुक आहेत. या मतदारसंघात भाजपचे बाळ माने ठाकरे गटात येणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर ते ठाकरे गटात आले तर या तिघांमध्ये उमेदवारीवरून स्पर्धा निर्माण होईल.