
घरात झोपलेल्या वृद्धवर माकडाने केला हल्ला, वृद्धवर उपचार सुरू
संगमेश्वर : घरामध्ये झोपलेल्या वृद्धावर माकडाने हल्ला केल्याची घटना देवरुख कुंभ्याचा दंड येथे घडली. या हल्ल्यात डोक्याला दुखापत होऊन वृद्ध जखमी झाला असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णलयात उपचार सुरू आहेत.
देवरूखात बिबट्याचा वावर सुरू असताना माकडांचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागत आहे. देवरूख कुंभ्याचा दंड येथे गेली अनेक दिवस माकडांनी धुमाकूळ घातला आहे. येथीलच नंदकुमार दामुष्टे हे घरी झोपलेले असताना गुरूवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घरात शिरलेल्या माकडाने दामुष्टे यांच्यावर अचानक हल्ला केला. यात दामुष्टे यांच्या कपाळाला दुखापत झाली आहे.
हा प्रकार निदर्शनास येताच मुलगा नरेंद्र दामुष्टे याने नंदकुमार यांना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. येथील तरूण सामाजिक कार्यकर्ते वैभव संसारे व साईन दामुष्टे यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. यानुसार देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला यांनी तातडीने देवरूख ग्रामीण रूग्णालयात जावून जखमी नंदकुमार दामुष्टे यांची विचारपुस केली तसेच घटनास्थळाची पाहणी केली. माकडांचा बंदोबस्त करण्यात यावा , अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.