
उमेदवारीबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट: चित्रा वाघ
रत्नागिरी:- आमचा पक्ष बेशिस्त नाही, शिस्तीचा पक्ष आहे. सर्वांनाच वाटतं की आपण जास्त जागा लढवाव्यात मात्र महायुती आहे. लवकरच उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होईल. कोण कुठून लढणार हे जाहिर होईल, असे सांगत महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहिरनाम्याची तयारी आता अंतिम टप्यात आली असून पक्षाने त्याचे स्वरूप परंपरागत जाहिरनाम्याच्या दोन पाऊल पुढे जाऊन आता ‘अंमलबजावणी आराखडा’ करण्याचे निश्चित केले आहे. या आराखड्यासाठी मतदारांनी विविध मुद्यांबाबत महाराष्ट्राच्या विकासाच्या आपल्या आकांक्षा सूचनांच्या स्वरूपात पक्षाकडे पाठवाव्यात अशी माहिती आमदार चित्रा वाघ यांनी बुधवारी रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत दिली.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारांनी केंद्रात आणि राज्यात अंमलबजावणीच्या आघाडीवर उल्लेखनीय यश मिळविले आहे. परंपरागत जाहीरनाम्यात केवळ आश्वासने असतात. संकल्प पत्र ही पुढची पायरी होती. आता सत्तेवर पुन्हा येण्याच्या आत्मविश्वासातून आम्ही आमच्या संकल्पांतून कशा प्रकारे अमलात आणायचा आराखडा तयार करीत आहोत’, असे ही आ. चित्रा वाघ यांनी सांगितले.
भाजपने २०२४ च्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी ३० सदस्यांची एक जाहीरनामा समिती नियुक्त केली असून ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह या समितीत सर्वश्री डॉ. विनय सहस्रबुद्धे, माधव भांडारी, उज्ज्वल निकम, डॉ. भारती पवार, सुभाष देशमुख, श्रीम. माधवी नाईक, दिलीप कांबळे, खा. धनंजय महाडिक, संभाजी निलंगेकर, धनंजय मंगरूळे, केशव उपाध्ये, अनिल सोले, नरेंद्र पवार इत्यादींचा समावेश आहे. सूचना पाठविण्यासाठी पक्षाने आपल्या वेवसाइटवर एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. मतदारांनी इ-मेल अथवा पत्र पाठवून आपल्या ठोस सूचना पाठवाव्यात असे आवाहन पक्षाने केले आहे.
मुख्य समितीच्या अंतर्गत विविध विषयांसाठी एकूण १८ उप-समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. यात उज्ज्वल निकम (कायदा-सु-व्यवस्था), माधव भांडारी (मदत आणि पुनर्वसन), पाशा पटेल (शेती आणि शेतकरी), खा. श्रीमती स्मिता वाघ (महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण), दिलीप कोबळे (सामाजिक न्याय), प्रा. श्रीपाद ढेकणे (शिक्षण), आणि लद्दाराम नागवानी (ज्येष्ठ नागरिक) इत्यादींचा समावेश आहे.
राज्याच्या विविध भागातील विविध समाज घटकांच्या प्रतिनिधींबरोबर समक्ष चर्चा, ऑनलाइन पद्धतीने विचार विमर्श बैठका आणि मान्यवरांचा सल्ला घेण्यासाठी वार्तालाप इत्यादी उपक्रम अमलात येत आहेत. या शिवाय एक स्वतंत्र फेसबुक पेज, तसेच द्विटर आणि इन्स्टाग्राम खाती आणि विशिष्ट इ-मेल आय.डी. देखील तयार करण्यात आले आहे, अशीही माहिती आ. चित्रा वाघ यांनी यावेळी दिली.