
टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सेवेत रुजू; ५० बेडची सुविधा
रत्नागिरी, : खासगी रुग्णालयांना लाजवेल असे आणि विशेष म्हणजे नगरपालिकेचे असलेले मजगाव रोड येथील ५० बेडचे लोकमान्य टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रत्नागिरीकरांच्या सेवेत रूजू झाले आहे. या रुग्णालयामध्ये दोन अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स असून त्यापैकी एक सुप्रा मेजर ऑपरेशन थिएटर आहे; ज्यामध्ये अतिशय किचकट व वेळखाऊ सर्जरी अद्ययावत तंत्र वापरून करता येण्याची सोय आहे.
रत्नागिरीतील आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी या सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालयाची आखणी व उभारणी केली आहे. अत्यंत सुरेख डिझाईन आणि काटेकोरपणे केलेलं हे काम रुग्णांच्या सोयींचा विचार करून केलेलं आहे. पालिकेच्या मजगाव रोडवरील ज्या जागेत पूर्वी कोविड रुग्णालय होते त्याच ठिकाणी हे नवीन सुसज्ज रुग्णालयात उभे राहिले आहे. रुग्णालयात जनरल वॉर्ड, कॅज्युल्टी वॉर्ड, स्वतंत्र महिला व पुरुष वॉर्ड आहेत. कन्सल्टंट डॉक्टरांच्या रूम्स आहेत. शस्त्रक्रियेवेळी उपकरणे घेण्यासाठी थिएटर सातत्याने उघडबंद करताना हवेशी संपर्क येऊन अशुद्ध होऊ नये आणि शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना हाती उपकरणे घ्यायला नको म्हणून ‘सीएसएसडी’ची सोय केलेली असून, तिथून ‘पास बॉक्स’मध्ये उपकरणे येतात. यामुळे उपकरणे आणि वातावरणही अत्यंत शुद्ध राहते. ऑपरेशन थिएटर्सनंतर लगेच रिकव्हरी रूम (सर्जिकल आयसीयू) आहे. चांगल्या आहाराची सुविधा रुग्णालयातच दिली जाणार आहे.चौकट
सवलत योजनांचा लाभ
खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांचे कॉम्बिनेशन असणारे हे रुग्णालय अत्याधुनिक आहे. येथे राज्य व केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या विविध उपचारांसाठीच्या सवलत योजनांचा लाभ घेता येईल. नगरपालिकेने सार्वजनिक आरोग्यात कार्यरत असलेल्या मुंबईच्या साधना फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे.