
बावनदी येथे कंटेनरची दोन दुचाकींसह दुकानांना ठोकर
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर थेट रस्त्याकडेच्या दुकानात घुसला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या २ दुचाकींना धडक देऊन थेट दुकानात शिरला. यावेळी दुकानात असलेली वृद्ध महिला बालंबाल बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कंटेनरने धडक दिल्यामुळे विजेचा खांब कोसळला. आणि विजेच्या तारा दुकानाच्या पत्र्याला स्पर्श करत होत्या. याची माहिती तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. विद्युत प्रवाह बंद केल्यावर महिलेला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही घटना शनिवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
नितीनकुमार सिंग (33, रा. उत्तरपदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. नितीनकुमार हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेवून मुंबई-गोवा महामार्गाने जात होता. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास तो निवळी बावनदी येथे आला असता त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला. यावेळी कंटेनर रस्त्याकडेच्या दुकानात शिरल़ा या अपघातात दोन दुकानांचे नुकसान झाल़े तर एक जखमी झाला. यापकरणी विजय धोंडूशेठ आडविलकर (68, रा.बावनदी रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली.