
बीएसएनएलकडून ५ जीचे सीमकार्ड वितरण
चिपळूण: ग्राहकांना दर्जेदार व जलद नेटवर्कची सेवा देण्यासाठी बीएसएनएलने पुढाकार घेतल्यामुळे चिपळुणातील ग्राहकांनी पुन्हा बीएसएनएलकडे मोर्चा वळवला आहे. चिपळुणातील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयातून ५जी सीमकार्ड वितरणाचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत शंभर नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे.
चिपळूण तालुक्यात गावोगावी बीएसएनएलची सेवा होती. घरगुती, सरकारी-निमसरकारी, बँका, पतसंस्था यांच्यासह विविध अस्थापना बीएसएनएल कंपनीने जोडली गेली होती. एकेकाळी दूरध्वनी कनेक्शन घेण्याबरोबरच मोबाईलचे सीम घेण्यासाठी एकेकाळी बहादूरशेख नाका येथील मुख्य कार्यालयात नागरिकांच्या रांगा लागत होत्या; मात्र त्यानंतर या सरकारी कंपनीची सेवा कोलमडत गेली. त्यामुळे बीएसएनएलकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्याचा मोठा फटका बसला. येथील मुख्य कार्यालयाची इमारत मोठी आणि कर्मचारी संख्या छोटी अशी दयनीय अवस्था झाली आहे. २००५ व २१च्या महापुरात बुडालेल्या या कार्यालयाला उभे करण्यासाठी शासनस्तरावरून निधी मिळाला नाही. सध्या खासगी मोबाईल कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवल्यामुळे बीएसएनएलला बळ मिळत आहे. सध्या चिपळुणात ५जी सेवा देण्यासाठी ठिकठिकाणी टॉवर उभारले जात आहेत तसेच ५जी सेवेची सीमकार्डही येथे उपलब्ध झाली आहेत. सध्या या सीमकार्डचे वितरण सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नेटवर्कचे जाळे निर्माण करणारी बीएसएनएल कंपनी अन्य कंपन्यांना ’टक्कर’ देण्यासाठी सज्ज झाली आहे.