महिला सक्षमीकरणासाठी कायद्याचा जागर
जिल्ह्यात २७ कार्यक्रम ; सखी सेंटरमार्फत आयोजन
रत्नागिरी ः महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांविषयी महिलांना माहिती देणे आणि त्यांना सक्षम बनवणे यासाठी भारत सरकार पुरस्कृत मिशन शक्तीअंतर्गत सबल आणि महिला सक्षमीकरण केंद्राद्वारे सखी सेंटरने रत्नागिरी जिल्ह्यात २७ जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये १ हजार ३९९ लोकांनी सहभाग घेतला.
महिला सक्षमीकरणासाठी २१ जून ते ४ ऑक्टोबरपर्यंत जनजागृती अभियानांतर्गत रत्नागिरीतील सखी सेंटरमार्फत विविध विषयांशी निगडित रत्नागिरी जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. या अभियानांतर्गत सखी सेंटर रत्नागिरीतर्फे जिल्ह्यातील लांजा, राजापूर, देवरूख, रत्नागिरी, गुहागर तालुक्यात तसेच प्रभागसंघ शिरगाव, कोचारी शाळा, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, सीताई पार्क महिला बचतगट, कुर्णे महिला बचतगट, राई महिला बचतगट, भराडीण प्रभाग संघ कासारवेली, अंगणवाड्या, पोलिस ठाणे लांजा, खावडी शाळा लांजा, प्राथमिक आरोग्यकेंद्र हेदवी गुहागर, सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी, परकार हॉस्पिटल, रहाटाघर रत्नागिरी, महिलाश्रम लांजा, आजी-आजोबांचा गाव कोंड्ये लांजा, गोळप ग्रामपंचायत, मिलंद राजापूर, भाट्ये ग्रामपंचायत, समाजकल्याण महिला वसतिगृह या ठिकाणी पोक्सो, महिलांविषयी कायदे, महिला सक्षमीकरण केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर, कौटुंबिक हिंसाचार कायदा, सखी निवास, पीसीपीएनडीटी अॅक्ट, गुड टच बॅड टच, महिला सक्षमीकरण इत्यादी विषयांवर कार्यक्रम घेऊन माहिती देण्यात आली.
या अभियांनाअंतर्गत एकूण २७ कार्यक्रम घेण्यात आले. त्यात एकूण १ हजार ३९९ लोकांचा सहभाग होता. हे अभियान सखी सेंटरच्या केंद्र प्रशासक अश्विनी मोरे, समुपदेशक स्वरा मयेकर, पॅरा मेडिकल ऑफिसर सुप्रिया शितप, आयटी स्टाफ प्रियांका बोरकर यांनी या उपक्रमात मेहनत घेतली व अभियान यशस्वी केले.