कुवारबाव येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- कुवारबाव रेल्वस्टेशन येथे भंगार गोळा करणारा बिहारी प्रौढ बेशुद्ध अवस्थेत आढळला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मनोजकुमार श्रीलखन महातो (वय ४५, रा. रेल्वे स्टेशन, कुवारबाव, रत्नागिरी. मुळ ः बेलवाडी-मैसाल, बदलामपूर, जि. कटीयाल, राज्य बिहार ) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १०) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोजकुमार महातो हा कुवारबाव रेल्वेस्टेशन परिसरात एका पडक्या इमारतीत राहायचा. रेल्वे स्टेशन येथील प्लास्टीक बाटल्या, भंगार गोळा करायचा व ते विकून त्याचा उधरनिर्वाह चालत असे. गुरुवारी त्याचा सहकारी राजू महादेव दास याला तो त्याच्या रहाण्याच्या ठिकाणी पडक्या इमारतीत बेशुद्ध अवस्थेत आढळला. या बाबत कुवारबाव पोलिसांना याची खबर दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले व महातो याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.