
रिळ-उंडीतील जमीन मोजणी पूर्ण?
रत्नागिरी: तालुक्यातील रिळ आणि उंडी गावामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा शेती आणि झाडांसंदर्भातील अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान या परिसरातील जमीन मोजणी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रिळ गावातील १३६ सातबारावरील १५३ हेक्टर जमीन संपादित करण्याचे प्रस्तावित झाले आहे. तर उंडी गावात ४९ सातबारा भागांवरील ६० हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव आहे. एकूण २१३ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. या सर्व जमीन मालकांना शासकीय मूल्याच्या ४ पट एवढ्या प्रमाणात मोबदला मिळेल. रत्नागिरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी भूसंपादनाचा प्रस्ताव रत्नागिरी तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठवला. त्यानंतर जमीन मोजणी २० सप्टेंबरपासून सुरू झाली होती. संबंधित जमिनींमधील शेती, झाडे या संदर्भातील अहवाल उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.