
चिपळुणात दोघा पादचाऱ्यांना दुचाकीची धडक
चिपळूण : दुचाकीस्वाराने दोन पादचाऱ्यास धडक दिल्याची घटना कळंबस्ते फाटा सॉमिल गेटजवळ ३० रोजी रात्री ११.१५च्या सुमारास घडली. यात दोन पादचारी जखमी झाले असून या प्रकरणी संबंधित दुचाकीस्वारावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश राजाराम कदम असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद मंगेश मोहन महाडिक (३४, चिपळूण) यांनी दिली, तर मंगेश महाडिक यांच्यासह किशोर केशव प्रभुलकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश महाडिक व त्यांचे मित्र किशोर प्रभुलकर असे दोघेजण बाहेर जेवण करून घरी पायी चालत येत होते. असे असताना राकेश कदम याने त्यांना पाठीमागून धडक दिली. यात ते दोघे जखमी झाले असून या प्रकरणी दुचाकीस्वार राकेश कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.