
अडखळ येथील खाडीत बुडून खलाशाचा मृत्यू
दापोली : तालुक्यातील अडखळ येथील खाडीत बुडून किशोर रामचंद्र पाटील (५४) यांचा मृत्यू झाल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. पाटील हे हर्णे फत्तेगड येथील रहीवासी असून मूळ गाव रायगड जिल्ह्यातील म्हसाळा- तुरुंबाडी हे आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर पाटील हे पाजपंढरी येथील अशोक लाया पावसे यांच्या श्री स्वामी समर्थ कृपा या मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करीत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. त्यांनी पत्नी जनीबाई हिला गावी फोन करून आपण तुरुंबाडी येथे मासेमारी बोटीवर असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी त्यांची बोट अडखळ येथे खाडीत असल्याचेही सांगितले होते.
त्यानंतर अडखळ केळसकरवाडी येथील खाडीकिनारी पाण्यात ते तरंगत असताना आढळून आले. त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची आरोग्य तपासणी करून ते मृत असल्याचे घोषित केले. किशोर पाटील यांचा मृत्यू १ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० ते २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:२० या मुदतीत घडला असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत दापोली पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.