
पोलिसालाच मारहाण करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- पती पत्नीला मारहाण करत होता. त्यावेळी पत्नीने पोलिसांनी फोन वरुन बोलावून घेतले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना पतीने शिवीगाळ व मारहाण करुन दुखापत केली. पोलिसांनाच मारहाण करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप शंकर राठोड (३७, रा. कोकणनगर रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २९ सप्टेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास कोकणनगर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताची पत्नी सौ. प्राजक्ता दिलीप राठोड हिने शहर पोलिस ठाण्याच्या लॅण्ड लाईन फोनवर फोन करुन संशयित पती दिलीप मारहाण करत असून मला मदतीची गरज आहे असे सांगितले. त्यावेळी शहर पोलिस ठाण्याचे ड्युटीवर असलेले पोलिस व चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल साळवी हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिस सौ. प्राजक्ता राठोड यांच्या घरी गेले असता संशयित दिलिप हा पत्नी सौ. प्राजक्ता हिला मारहाण करत होता. पोलिसांनी त्याला समजावून तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने साळवी यांना अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण केली व गळा दाबुन सरकारी कामात अडथळा केला. मद्याच्या नशेत हातवारे आरडा-ओरडा करुन शांततेचा भंग केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्र खापरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.