बेकायदा मटका जुगारावर लांजा पोलिसांची कारवाई
लांजा: बेकायदा कल्याण मटका जुगार खेळविणाऱ्यावर लांजा पोलिसांनी कारवाई करताना मुद्देमाल जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आहे ही कारवाई तालुक्यातील सापुचेतळे येथे २७ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवधे पावस रोडवर सापुचेतळे येथे रामचंद्र गोरे यांच्या मालकीच्या व्यापारी गाळ्याच्या मागील मागील बाजूस असलेल्या बोळात एकजण कल्याण मटका जुगार खेळत असल्याची खबर लांजा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी दुपारी २.४५ च्या सुमारास धाड टाकली. यावेळी कैलास पुंडलिक पाटील (वय ६२ राहणार शिवार आंबेरे पाटीलवाडी, तालुका रत्नागिरी) हा व्यक्ती जुगाराच्या साहित्यासह आढळून आला. यावेळी पोलिसांनी ५७५ रुपये रोख रक्कम व बॉलपेन असा ५७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी कैलास पाटील याच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस मोरे हे करत आहेत.