
सावर्डे विद्यालय रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम
चिपळूण: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियानात सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करण्याचा बहुमान पटकावला व सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियानातील खाजगी शाळा विभागाचा निकाल नुकताच रत्नागिरी जिल्हा मूल्यांकन समितीने जाहीर केला आहे. 4 ऑगस्ट 2024 ते 5 सप्टेंबर 2024 या कालावधीत हे अभियान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात आले अत्यंत उत्स्फूर्तपणे या अभियानामध्ये विद्यालयाने सहभाग नोंदवून विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शालेय व सहशालेय उपक्रमाचे सादरीकरण केले. भाग अ पायाभूत सोयी सुविधा, भाग ब शासन ध्येय-धोरण अंमलबजावणी, भाग क शैक्षणिक संपादणूक या मुद्यांची पीपीटी व पीडीएफ फाईलच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष शाळेची तपासणी केली. सुविचार, शालोपयोगी चार्टस्, प्रबोधनात्मक चित्रांनी लक्ष वेधून घेणाऱ्या संरक्षक भिंती, विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मदतीने केलेली सुंदर वर्ग सजावट, आणि आकर्षक शालेय इमारत,तसेच कलागुणांनी निपुण आणि बोलके विध्यार्थी या सर्वांचे कौतुक केले.
शासनाच्या ध्येय धोरणानुसार शाळेत वेळोवेळी राबविल्या गेलेले उपक्रम, स्वच्छता मॉनिटर, पीएम विद्या, वर्तमान पत्रांची उपलब्धता व उपक्रमांची प्रसिद्धी, विद्यांजली, महावाचन, नवसाक्षरता, वृक्ष संवर्धन,विद्यालयाने यू ट्यूब चॅनल व फेसबुकच्या माध्यमातून केलेले जनजागृतीचे काम या सर्व बाबींची जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने विशेष दखल घेतली. शैक्षणिक दर्जासह अद्ययावत ठेवलेल्या नोंदणीचे विशेष कौतुक करून स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
पंचायत समिती चिपळूण गटशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षणाधिकारी यांचे सह सर्व पदाधिकारी, पालक व विद्यार्थ्यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
या अभियानात पहिल्या वर्षी विभाग स्तरावर द्वितीय दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक विद्यालयाने प्राप्त करून दैदिप्यमान यशाबद्दल प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम संचालक शांताराम खानविलकर सचिव महेश महाडिक संस्थेचे सर्व पदाधिकारी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शालेय समिती व सर्व सदस्य पालक ग्रामस्थ व शिक्षण प्रेमींनी विद्यालयाचे अभिनंदन केले आहे.