
सावकार राधा लवेकरला अखेर चिपळुणात अटक
चिपळूण: ॲट्रॉसिटीसह सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राधा लवेकर. हिला अखेर सोमवारी चिपळूण पोलिसांनी अटक केली. यावेळी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर कामथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरातील बहादूरशेख नाका येथे एका महिलेने राधा लवेकर हिच्याकडून कर्ज स्वरुपात २० हजार रुपये घेतले होते. हे कर्ज फेडल्यानंतर त्यासाठी दिलेल्या कागदत्राची त्या महिलेने मागणी केली असता लवेकर हिने तिला जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी लवेकर हिच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात सावकारी व ॲट्रॉसिटीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच लवेकर हिने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असता. तिचा जामीन अर्ज फेटाळून लावत पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात आदेश दिले होते.
असे असताना सोमवारी तिला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, अटकेच्या कारवाईनंतर लवेकर हिची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर कामथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.