
भोस्ते घाटात दोन अपघातात दोघे जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात दोन अपघात झाल्याची घटना शनिवार सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. एका अपघातात कंटेनर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने अपघात झाला. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला. तर दुसऱ्या अपघातात एस टी प्रशिक्षण वाहनाने दुचाकी स्वाराला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी एसटीच्या पुढील चाकांमध्ये अडकली. मात्र दुचाकीस्वाराने बसच्या खालूनच पुढे पलटी मारल्याने तो बालंबाल बचावला. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे. दोन्ही अपघात जवळपास १०० मीटर अंतरावर झाले.
सविस्तर वृत्त असे की, कंटेनर चालक मुंबईहून गोव्याच्या दिशेने चालला होता मात्र भोस्ते घाटात त्याला वळणाचा अंदाज न आल्याने कंटेनर पलटी झाला. यावेळी चालकाने बाहेर उडी मारल्याने तो बचावला. त्याला किरकोळ दुखापत झाली.
बाजूला जवळपास १०० मीटर अंतरावर दुसरा अपघात झाला. प्रशिक्षणार्थी चालक घेऊन बस चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जात होती. यावेळी भोस्ते घाटनजिक स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने नवशीक्या चालक गोंधळून गेला. त्याने समोर दुचाकी (एम एच ०८ एफ ६३४३) ला मागून धडक दिली. यावेळी दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत गाडीवरून उडी मारली आणि बसच्या पुढच्या चाकाखालून बाहेर पडला. मात्र तोपर्यंत बस चालकाने दुचाकी जवळपास 10-15 फुटापर्यंत फरफटत नेली. सुदैवाने दुचाकीस्वाराच्या डोक्यात हेल्मेट असल्याने तो बचावला. त्याचा उजवा हात मात्र फॅक्चर झाला. अपघाताची माहिती मिळताच खेड वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.