
२५ लाखांच्या फसवणूक प्रकरणातील सूत्रधाराचा शोध
खेड:- शहरातील एका तरुणाच्या ऑनलाईन २४ लाख ८५ हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा येथील पोलिसांना सुगावा लागला आहे. संशयित सूत्रधार आर्थिक व्यवहारांची सर्व सूत्रे ‘हॅण्डल’ करत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. संशयित भारतातीलच असून त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी लवकरच पोलीस निरीक्षक भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथके रवाना होणार आहेत.
शहरातील एका तरुणास जादा रक्कमेच्या परताव्याचे आमिष दाखवत तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी आतापर्यंत चौघांना गजाआड केले आहे. यातील दोघे न्यायालयीन कोठडीत, तर अन्य दोघे पोलीस कोठडीत आहेत. सुरत येथे अटक केलेल्या जिम्मीभाई भगत (४०), सोनू टेलर (२४) या दोघांची येथील पोलिसांनी कसून चौकशी केली असता मुख्य सूत्रधाराची माहिती हाती लागली. पोलिसांनी दोन्ही संशयितांचे ३० हजार रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करत त्यातून काही माहिती मिळवण्याचाही प्रयत्न सुरू आहे. मुख्य सूत्रधाराचा पोलिसांना सुगावा लागल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी लवकरच पोलिसांची
पथके ठिकठिकाणी रवाना होणार आहेत. हा मुख्य सूत्रधार आर्थिक व्यवहाराचे सर्व सूत्रे सांभाळत होता. फसवणूक केलेली रक्कम खात्यात जमा केल्यानंतर ओटीपीही त्यालाच जात होता, अशी माहिती समोर आली आहे.
मुख्य सूत्रधाराला गजाआड केल्यानंतरच फसवणुकीतील रक्कमेचा उलगडा होणार आहे. राजस्थान ‘कनेक्शन ही उघडकीस येणार आहे. अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.