लांजा येथे रेल्वेतून पडून तरुण जखमी
रत्नागिरी : रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या मध्य प्रदेश येथील तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामसजीवन बैगा (२४, रा. उरती, चिंगरोली मध्यप्रदेश) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी लांजा तालुक्यातील आडवली ते वेरवली रेल्वे स्थानकांदरम्यान निदर्शनास आली.
रामसजीवन हा रेल्वेतून पडून जखमी झाला. उपचारासाठी त्याला लगेचच लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून, अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, तो कोणत्या गाडीने कुठून कुठे जात होता याची माहिती मिळू शकली नाही.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या प्रकाराबाबत तसेच या जखमी व्यक्तीबाबत अधिक माहिती घेत आहेत.