
२४ लाखांच्या फसवणूक प्रकरणी मास्टर माइंडचा शोध सुरू
खेड:- शहरातील एका तरुणाची २४ लाख ८५ हजार रूपयांची फसवणूक प्रकरणी येथील पोलिसांनी आणखी दोन भामट्यांना गजाआड केल्यानंतर फसवणूक प्रकरणाचे राजस्थान ‘कनेक्शन’ उघड झाले आहे. या ‘कनेक्शन’च्या मास्टर माइंडचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी कंबर कसली असून सखोल तपास करण्यात येत आहे. अटकेतील दोन्ही भामट्यांना १८ सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पैशांची गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत येथील एका तरुणाची २४ लाख ८५ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी यापूर्वीच दोघांना गजाआड केले होते. फसवणूक प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर जिम्मीभाई सुनीलभाई भगत (४०), सोनू रामलाल टेलर (२४) या दोघांच्या सुरत येथून मुसक्या आवळल्या होत्या. हे दोघेही पोलीस कोठडीत आहेत. फसवणूक प्रकरणी राजस्थान ‘कनेक्शन’ असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास गतिमान केला आहे. दोन्ही भामट्यांकडून ४० हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईलही हस्तगत केले आहे. २४ लाख फसवणूक प्रकरण या मोबाईलमधून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. आणखी काहींचा सहभाग असण्याच्या शक्यतांचाही पोलिसांकडून पडताळा करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर अधिक तपास करत आहेत.