
गर्दीचा फायदा घेत महिलेच्या ३ लाखाच्या दागिन्यांची चोरी
चिपळूण:- गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला प्रवाशाचे तब्बल ३ लाखाचे दागिने चोरल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बसस्थानकात दागिने चोरीचे सत्र थांबलेले दिसून येत नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला पतीसह रविवारी चिपळूण ते रत्नागिरी असा प्रवास करणार होती. मध्यवर्ती बसस्थानकात खेड-रत्नागिरी ही एस.टी. बस आली असता त्यामध्ये ही महिला चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेत त्या महिलेच्या खांद्याला असलेली पर्सची चैन उघडून त्यामध्ये ठेवलेले छोटे पाकिट चोरून नेले. त्यामध्ये तब्बल तीन लाख ३ हजार २५० रुपये किंमतीचे १२ तोळे ५ ग्रॅम किंमतीचे तोडे, कर्णफुले, हार असा ऐवज होता. हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील मध्यवर्ती बसस्थानकात महिलांचे दागिने चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या चोरीप्रकरणाचा. अद्याप तपास सुरु आहे. असे असताना रविवारी झालेल्या चोरीप्रकरणानंतर बसस्थानकात दागिने चोरी सत्र थांबवलेले नसून यामुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.