
वाटूळ येथे क्रेटा गाडीच्या धडकेत तीन म्हैशींचा जागीच मृत्यू
राजापूर: मुंबई गोवा महामार्गावर वाटूळ धनगरवाडी येथे गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेटा गाडीने धडक दिल्याने तीन म्हैशींचा जागीच मृत्यू झाला असून एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात शेतकरी लवू गोविंद गोरे यांचे सुमारे चार लाख दहा हजाराचे नुकसान झाले आहे. तशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी लवू गोविंद गोरे यांनी राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. आपला म्हैशी पालनाचा व्यवसाय असून शुक्रवारी सायंकाळी आपण ही जनावरे शेतातून घराकडे जात असताना गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव क्रेटा गाडी क्र. एम. एच. ०३, सीएस २६४४ ने जोरदार धडक दिल्याने तीन म्हैशींचा जागीच मृत्यु झाला. तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. यामध्ये क्रेटा गाडीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात दुभत्या म्हैशींचा मृत्यु शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
याप्रकरणी राजापूर पोलिसांनी क्रेटा चालक अमोल अनिल आचरेकर वय ३४ रा. गुरामवाड कट्टा ता. मालवण जि. सिंधुदुर्ग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधीक तपास राजापूर पोलीस करीत आहेत. या घटनेची माहीती मिळताच राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांसह पशुवैद्यकीय अधिकारी श्री. किनरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी करून पंचनामा केला.