
खेडमध्ये बंद घरातून २ लाखाच्या दागिन्यांची चोरी
खेड : घरात कोणी नसल्याची संधी साधत बंद घरातून दागिन्यांसह लोखंडी कुलूप चोरट्याने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी घडली. चोरट्याने तब्बल २ लाख १८ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरला आहे.
या चोरीबाबत दादा महादेव देवरुखकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते पत्नी व मुलांसमवेत शुक्रवारी दुपारी १:३० वाजण्याच्या दरम्यान घर बंद करुन बाहेर गेले होते. हे सर्वजण सायंकाळी ५:२२ वाजण्याच्या दरम्यान घरी आले असता त्यांना मुख्य दरवाजाचा कडी, कोयंडा तोडल्याचे लक्षात आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता खोलीतील कपाटातील २ लाख १८ हजाराचे २ तोळे ८५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसले. तसेच दरवाजाला लावलेले लोखंडी कुलूपही चोरट्याने नेले. या कुलपाची किंमत ३०० रुपये आहे. या चोरीप्रकरणी खेड पोलिस स्थानकात शनिवारी नोंद करण्यात आली आहे.