
दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू; ४ महिन्यांनी गुन्हा दाखल
दापोली : तालुक्यातील वाकवली कोंडवाडी येथे दुचाकी अपघातात अनिल रामचंद्र पिंपळकर या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना ६ मे रोजी घडली होती. याची नोंद तब्बल ४ महिन्यांनी दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली. या प्रकरणी मृत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास अनिल पिंपळकर (कुंभवे) खेडकडून दुचाकीने दापोलीकडे येत होते. ते स्वतः दुचाकी चालवत होते. ते वाकवली-कोंडवाडी येथील विठ्ठल मंदिरासमोर आले असता त्यांच्या ताब्यातील दुचाकीचा ताबा सुटल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद दापोली पोलीस स्थानकात ५ सप्टेंबर रोजी करण्यात आली असून अनिल पिंपळकर यांच्यावर स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास दापोलीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगधर करीत आहेत.