
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार…
जिल्ह्यात आज घरगुती १ लाख ६६ हजार ८६७ तर १२२ सार्वजनिक गणेशमूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठापना
रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात वाजत-गाजत आज बाप्पाचे आगमन होणार आहे.
यावर्षी जिल्ह्यात गणेश चतुर्थीला घरगुती १ लाख ६६ हजार ८६७ तर १२२ सार्वजनिक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. गतवर्षी २०२३ पेक्षा यावर्षी घरगुती गणपतींमध्ये ११९ ने घट झाली आहे. सार्वजनिक गणपतींमध्ये सहाने वाढ झाली आहे.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरगुती गणेशोत्सवाची मोठी परंपरा कोकणाला लाभली आहे. शनिवारी ( ता .७) सकाळी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होऊन प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. घरोघरी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गणेशभक्तांनी बनवलेल्या मखरात बाप्पा विराजमान होणार आहेत. वाजत-गाजत मिरवणूकीने गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. रत्नागिरी शहरातून निघणारी कर्ला-आंबेशेतची गणपती आगमन मिरवणूक लक्षवेधी असते. गेली ३९ वर्ष हि आगमन मिरवणूकीची परंपरा जपली गेली आहे.
गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी घरे सजली
आहेत. काही ठिकाणी इको फ्रेंडली सजावट
करण्यात आली आहे. गणपती सजावटीच्या स्पर्धा हि आयोजित करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जय्यत तयारी करताना विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय गणेश मूर्तींची आकडेवारी
रत्नागिरी शहर ७९३६ घरगुती, सार्वजनिक २५; रत्नागिरी ग्रामीण ११ हजार २१८ घरगुती तर सार्वजनिक १, जयगड घरगुती २७०८, सार्वजनिक ५; संगमेश्वर १३ हजार ५४४ घरगुती, सार्वजनिक १; राजापूर १९ हजार ९६६ घरगुती, तर सार्वजनिक ७, नाटे ७२७९ घरगुती, सार्वजनिक ३, लांजा १३ हजार ५४० घरगुती, सार्वजनिक ७, देवरूख १२,४९३ घरगुती, सार्वजनिक ७, सावर्डे १० हजार २४० घरगुती, सार्वजनिक १; चिपळूण १६ हजार ७२५ घरगुती, सार्वजनिक १६, गुहागर १४ हजार ४६० घरगुती, सार्वजनिक २, अलोरे ५८५० घरगुती, सार्वजनिक ३, खेड १३ हजार ७३६ घरगुती, सार्वजनिक २१; दापोली ६३३५ घरगुती, सार्वजनिक ९, मंडणगड २९९५ घरगुती, सार्वजनिक १०, बाणकोट ६५३ घरगुती, सार्वजनिक २, पूर्णगड ५६९० घरगुती, सार्वजनिक १, दाभोळ १४९९ घरगुती, सार्वजनिक १.