करबुडे – उक्षी मार्गावर बोलेरोचा अपघात, चालक जखमी
रत्नागिरी : करबुडे – उक्षी मार्गावर बोलेरोच्या अपघातात चालक जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ऋषिकेश लक्ष्मण पवार (२६, तुळसनी, देवरुख) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पवार हा आपल्या ताब्यातील बोलेरो (एमएच 08 एपी 5300) घेऊन हातखंबा ते संगमेश्वर चालला होता. महामार्गावर खड्डे असल्याने त्याने उक्षी मार्गाचा अवलंब केला. करबुडे फाट्यावरून उक्षी मार्गे जाताना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना गाडी मातीवरून घसरून थेट पऱ्यात कोसळली. यामध्ये चालक ऋषिकेश याला किरकोळ दुखापत झाली. अपघातात गाडीचे दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. चालकाला बाहेर काढण्यात आले. याबाबतची माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.