
निओमोशनची गाडी मिळाल्याने प्रौढाच्या जीवनात आनंद
रत्नागिरी : भाट्ये येथील खुतबुद्दीन मुसा मुकादम (वय ५१ वर्ष) हे २०-२२ वर्षांपूर्वी झाडावर चढून पडल्याने त्यांचे मणके तुटले, डावा पाय निकामी झाला. कोणाच्याही मदतीशिवाय घराबाहेर पडून काम करणे कठीण झाले. परंतु आत्मसन्माने पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करत होते. त्यांना रत्नागिरीच्या आरएचपी फाउंडेशन व फ्रेण्ड्स फाउंडेशन (ऐरोली, मुंबई) यांचे सहकार्य लाभले. इम्पॅक्ट गुरु फाउंडेशनने तपासणी व माप घेण्यासाठी दोन शिबिरे आयोजित केले. त्यामध्ये खुतबुद्दीन मुकादम यांची निवड झाली व गाडीसुद्धा मिळाली. यामुळे मुकादम यांच्या चेहेऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
खुतबुद्दीन यांनी इयत्ता आठवीचे शिक्षण झाल्यानंतर मच्छीमारीचा व्यवसाय सुरू केला. तसेच रिक्षा चालविणे, छत्री दुरुस्ती, इलेक्ट्रिशियनचे काम करायचे. त्यांचे लग्न झाले. परंतु लग्नानंतर काही वर्षांनी ते मित्रांसोबत फिरायला गेले असता आंब्याच्या झाडावरून तेव्हा फांदी तुटुन पडले. त्यात चार मणके तुटले, डावा पाय फिरला. मिशन हॉस्पीटलला (मिरज) दाखल झाले. तेथे मणका, पायावर शस्त्रक्रिया झाली. कॅलीपर लावून वॉकरच्या सहाय्याने थोडे थोडे चालायला लागले. पण घराबाहेर जाऊन काम करणे अशक्य झाले. त्या वेळी उदरनिर्वाहासाठी पत्नी अलामीन मुकादम यांनी मच्छी विक्रीचे काम सुरू केले. खुतबुद्दीन घरातली काम करुन मदत करु लागले.
घराबाहेर पडून कामाला जावे असे वाटत असताना मुकादम यांना आरएचपी फाउंडेशनने मदत केली. आरएचपी फाउंडेशन रत्नागिरी यांच्या मदतीने आणि फ्रेण्ड्स फाउंडेशन (ऐरोली मुंबई) यांच्या सहकार्याने मुकादम यांचे नाव निओमोशन गाडीसाठी सुचविले. सात दिवसांचे शिबिर इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन, बजाज फिनसर्व आणि निओमोशनने रॉयल गार्डन रिसॉर्ट (वसई) येथे आयोजित केला. त्यात निओमोशन गाडीविषयी सविस्तर माहिती देऊन गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देऊन गाडी ताब्यात दिली. या गाडीमुळे त्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होणार आहे. ते सेल्फ डिपेंडन्ट बनणार आहेत. कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जाऊन काम करु शकणार आहेत. गाडी मिळाल्यावर खुप खुश होते. त्यांनी आरएचपी फाउंडेशनचे आभार मानले.