
अत्याचार प्रकरणाचा लवकरच उलगडा
रत्नागिरी:- लैंगिक अत्याचार प्रकरणी तरूणीचा न्यायालयासमोर जबाब नोंदविला जाणार आहे. तपासाला गती मिळावी यासाठी वैद्यकीय अहवाल लवकरात लवकर मिळावा, यासाठी फॉरेन्सिक लॅबशी पत्रव्यवहार केला गेला आहे. आतापर्यंत या प्रकरणी १० जणांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविले आहेत. व्हॉट्सअॅप कंपनीकडुनही कॉल रेकॉर्ड मागविण्यात आले आहे. येत्या चार दिवसांमध्ये या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
रत्नागिरी शहर आणि जिल्हा सुररक्षत आहे. असुरक्षित म्हणण्याचे कारण नाही. नागरिकांनी संयम बाळगा. तपास अंतिम टप्प्यात आहे, त्यासाठी पोलिस यंत्रणा २४ तास राबत आहे. पोलिसांवर जनतेने विश्वास ठेवावा, असे आवाहन देखील त्यांनी केले. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदानमध्ये एका नर्सिंगच्या तरूणीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला होता. या घटनेने संपुर्ण शहर आणि जिल्हा हादरला. पोलिस दलाच्या कार्यपद्धतीकडे जमावाने बोट दाखविले, दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. परंतु हा प्रकार अतिशय संवेदनशील असल्याने पोलिस बारकाईने आणि गांभिर्याने तो हाताळत आहे. पीडित तरूणीने दिलेल्या जबाबाला अनुसरून पोलिस तपास करत आहेत. जबाबांमध्येही विसंगती आहे. जो मार्ग पीडित तरूणीने दिला, त्या मार्गावरील ६ सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहेत. दिलेला जबाब आणि प्रत्यक्षस्थिती यामध्ये काही प्रमाणात तफावतही आढळुन येत आहे. मोबाईल रेकॉर्ड तपासल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत १० जणांची चौकशी करून जबाब नोंदविले आहेत. यामध्ये नेमकी वस्तूस्थिती काय आहे, नेमका काय प्रकार घडला हे पोलिस लवकरच उघड करणार आहे.
घटनाक्रमामधील धागे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. वैद्यकीय अहवला आणि कॉल रेकॉर्ड मिळाल्यानंतर तपास पूर्ण करणे सोपे होणार आहे. आणखी चार दिवसांमध्ये या लैंगिक अत्याचारा प्रकरणातील सर्व प्रकार आपल्यासमोर येईल, अशी माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली.