
गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांना पोलिस कोठडी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भरणेनजीक स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 4 लाख रुपये किंमतीच्या गांजा – वाहतूकप्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्यानंतर मंडणगड कनेक्शन उघड झाले आहे. तिघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
गांजा नेमका आणला कुठून याचा येथील पोलिसांकडून कसून – शोध सुरू आहे. गांजा वाहतूक – प्रकरणी आणखी धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. उदयसिंह मदनसिंह चुंडावत (३७), विशाल विद्याधर कोकाटे(३४),सिध्देश उदय गुजर (३२) तिघेही रा. मंडणगड) हे तिघेजण महिंद्रा कंपनीच्या कारमधून (एम.एच ०११ सी.यु. ८१८७) २२.०५९ किलो ग्रॅम वजनाच्या गांजाची वाहतूक करत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गस्तीदरम्यान तिघांच्याही मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ४ लाख ४१ हजार १८० रुपये किंमतीचा गांजा व ६ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण १० लाख ४१ हजार ३८० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या तिघांनी गांजा नेमका आणला कुठून?, गांजा नेमके कुठे नेणार होते? याचा येथील पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. गांजा वाहतुकीचे मंडणगड कनेक्शन उघड झाल्यानंतर आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याबाबतचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री’ गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.