संतप्त जमावाने रत्नागिरी शहरातील वाहतूक रोखली
रत्नागिरी : रत्नागिरीतील वातावरण तणावपूर्ण बनले असून, जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका संतप्त जमावाने घेतली. शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर (सिव्हील हॉस्पिटल) जमलेल्या नागरिकांनी बस्तान मांडले.
“पोलीस प्रशासन हाय हाय” अशा घोषणा देत जयस्तंभाकडे जाणारी तसेच मारूती मंदिरकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक अडवून ठेवली.
त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर, शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी बसलेल्या जमावाशी चर्चा केली, तसेच तपासासाठी काही वेळाचा अवधी द्यावा, मुलीने दिलेल्या जबानीनुसार, वर्णनानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही सीसीटीव्ही फुटेज हातात आली असून, तपासाच्या दृष्टीने उपयोगी ठरणार आहेत. त्यामुळे लवकरच आरोपी पकडला जाईल, असे सांगून त्यांची मनधरणी केली. पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर शहरातील वाहतूक पूर्ववत झाली.