
चिपळुणात महिलेची सोन्याची पाटली चोरणारा अटकेत
चिपळूण : मोरवणे बसमध्ये चढताना महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरणाऱ्याला बुधवारी सायंकाळी ४ वाजता बहादूरशेखनाका येथे अटक करण्यात आली. बसमध्ये चढताना व बसस्थानकात सातत्याने अशा घटना घडत असल्याने महिलांमध्ये घबराट बसरली आहे.
अविनाश सुनील गायकवाड (२५, अंबरनाथ, ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, संबंधित महिला बुधवारी चिपळूण-मोरवणे जाणाऱ्या एसटीमध्ये बहादूरशेखनाका येथे चढत असताना तिच्या मागे उभा असलेल्या अविनाशने तिच्या उजव्या हातातील सोन्याची पाटली कोणत्यातरी हत्याराने कापून चोरी करून पळून जात होता.
हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरडा केला असता त्याला पकडण्यात आले. ही ३५ हजार रूपये किंमतीची पाटली पोलिसांनी जप्त केली. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या काही महिन्यांपासून दागिने चोरीचे सत्र सुरुच आहे. किरकोळ चोऱ्या होत असतानाच काही दिवसापूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल २ लाख रूपये किंमतीचे ४ तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरले.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असतानाच पुन्हा चोरी झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र पाटली चोरताना चोरटा जेरबंद झाल्याने त्याच्याकडून त्याच्या साथीदारांसह काही चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.