गावठी हातभट्टीची दारू विक्री, एकावर गुन्हा दाखल
लांजा : विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या विक्रीप्रकरणी पोलिसानी तालुक्यातील शिपोशी येथील एकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिपोशी हनुमानवाडी येथील राजेंद्र बाबल्या घावरे (३८) हा विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसानी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४५च्या सुमारास शिपोशी हनुमानवाडी येथे धाड टाकली.
यावेळी राजेंद्र घावरे हा हनुमानवाडी येथील एका घरासमोरील जंगलमय भागातील झाडा- झुडपाच्या आडोशाला गावठी हातभट्टीच्या दारूसह आढळला. यावेळी पोलिसांनी ४२५ रुपयांची मापाच्या पिवळसर मळकट रंगाच्या प्लास्टिक कॅनमध्ये असलेली ४ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने आढळल्याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र घावरे याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ ते कलम Ⅰ. ६५ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल : एस. एस. भुजबळराव करत आहेत.