
बजाज कंपनीच्या कार्यालयात वसुली कर्मचाऱ्याचा जोरदार राडा
रत्नागिरी : शहरातील बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी कंपनीतील वसुली कर्मचाऱ्याने जोरदार राडा घातला. फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील चार ते पाच लॅपटॉप या कर्मचाऱ्याने आपटून फोडले. तर फायनान्स कंपनीत एनओसी घेण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाला देखील मारहाण केली. यावेळी हा वसुली कर्मचाऱी दारूच्या नशेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. राजिवडा येथील एक ग्राहक संबंधित फायनान्स कंपनीमध्ये एनओसी घेण्यासाठी गेले होते. यावेळी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात जोरदार राडा सुरू होता. फायनान्स कंपनीतील एक कर्मचारी कंपनीतील लॅपटॉप ची तोडफोड करत असल्याचे या ग्राहकाच्या निदर्शनाला आले. तोडफोड करणारा कर्मचारी दारूच्या नशेत असून जोरजोराने शिवीगाळ देखील करत होता. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता संबंधित कर्मचारी रजिवडा येथील ग्राहकाच्या अंगावर धावून आला. नशेतील त्या कर्मचाऱ्याने ग्राहकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर संबंधित ग्राहक कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी नाशेतील त्या कर्मचाऱ्याने त्यांचा पाठलाग करत कार्यालयाच्या खाली देखील त्यांना मारहाण केली.
नियामत पावसकर,राजिवडा रत्नागिरी येथील नागरिक असून तो एका बॅंकेतून कर्ज काढण्यासाठी गेला होता,सदर बॅंकेने बजाज फायनान्स मधून एन ओ सी पत्र आणावयास सांगितले त्यानुसार नियामत पावसकर हे बजाज फायनान्स रत्नागिरी या कार्यालयात गेले,तेथे एन ओ सी घेत असताना तेथील शिरधनकर नामक वसुली अधिकारी हा दारु पिलेल्या अवस्थेत होता त्याने कार्यालयातील लॅपटॉप व इतर वस्तुंची मोडतोड केली आणि नियामत पावसकर याला मारहाण केली.नियामत पावसकर हे कार्यालयाचे खाली उतरले असता हा शिरधनकर त्याच्या मागून खाली आला आणि तेथेही मारहाण केली. याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी संबंधित ग्राहकाने शहर पोलिस स्थानकात धाव घेतली.