
नाटे येथे मच्छीमारी जाळी, शिसे चोरीला
राजापूर:- तालुक्यातील नाटे गणेशनगर येथे सुमारे दीड लाख रुपये किंमतीची मच्छीमारी जाळी व १ हजार किलो वजनाचे शिसे अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आदिब कासम पावसकर (रा. साखरीनाटे) यांनी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिब पावसकर हे मच्छीमार व्यवसायिक हनिफ काझी यांच्याकडे मॅनेजर म्हणून कामाला आहेत. सद्यस्थितीत पावसाळ्यामुळे मच्छीमारी बंद असल्याने मच्छीमारी नौकेवरील सर्व जाळ्या नाटे गणेशनगर येथील मुजिब गोवळकर यांच्या बंदीस्त शेडमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मागील काही दिवसांपासून जाळ्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. शनिवारी एका जाळीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने कामगारांनी शेडमध्ये झाकून ठेवलेली दुसरी जाळी दुरुस्तीसाठी घेतली. यावेळी सदरच्या जाळीला शिशाचे छोटे रींग नसल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले.
कामगारांनी सदरची बाब मॅनेजर आदिब पावसकर व बोटमालक हनिफ काझी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आदिब पावसकर यांनी नाटे पालिसांत याबाबत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता ३०५ (अ), ३३१ (३), (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.