
आंबा घाटातील दोन मृतदेह काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा सुरु
साखरपा:- आंबा घाट सड्याचा कडा स्पॉटवर दोन मृतदेह काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आले होते. त्यानंतर या ठिकाणी देवरुख व शाहूवाडी पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत.
रात्री उशीर झाल्याने अतिशय घनदाट जंगल व खोल दरीत असल्याने मृतदेह आज सकाळी काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाला आहे.. राजू काकडे हेल्प अकॅडमी देवरुख आणि आंबा हेल्प अकॅडमी, पोलिस विभाग यांच्या संयुक्तपणे ही मोहीम पार पडणार आहे.
ही मोहीम सुमारे 4-5 तास चालू शकते.सुमारे 200-300 फूट असणारी दरी, घनदाट जंगल, दाट धुके यामुळे ही मोहीम जिकरीची असणार आहे. मृतदेह पश्चिम महाराष्ट्रातील दोन नागरिकांचे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र मृतदेह वरती काढल्यानंतर नेमके कोणाचे आहेत हे स्पष्ट होणार आहे.
त्याचबरोबर आत्महत्या असेल तर ती नेमकी एकाच ठिकाणी दोन जणांनी का केली हे पोलीस विभागा समोर प्रश्नचिन्ह आहे. घटना शाहुवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे,मात्र मृतदेह देवरुख पोलीस स्थानकाच्या हद्दीत मिळाल्याने नेमका गुन्हा कुठे नोंद होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.